लीड्स - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा वेस्ट इंडिजने २३ धावांनी पराभव केला. यामुळे या विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची पाटी कोरीच राहिली. अफगाणिस्तानला या सामन्यात निसटता पराभव स्वीकारावा लागला असला तरी अफगाणिस्तानच्या एका खेळाडूने सचिनच्या तब्बल २७ वर्षांपूर्वीचा विक्रमाला गवसणी घातली आहे.
अफगाणिस्तानच्या इक्रम अली खीलने मोडला सचिनचा तब्बल २७ वर्षांपूर्वीचा विक्रम! - ikram ali khil
इक्रम अली खील हा वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वोच्च धावांची खेळी करणारा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज इक्रम अली खीलने झुंजार फलंदाजी करत ८६ धावा ठोकल्या. इक्रम अली खील हा वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वोच्च धावांची खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने सचिनच्या 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाला मोडित काढले आहे.
१९९२ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सचिनने वयाच्या १८ व्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध 84 धावा केल्या होत्या. आता तो विक्रम अफगाणिस्तानच्या इक्रम अली खीलच्या नावावर झाला आहे. सामन्यात वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३११ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने आक्रमक सुरूवात केली. नंतर मात्र, मधली फळी ढेपाळल्याने अफगाणिस्तान निर्धारित ५० षटकात सर्वबाद २८८ धावा करु शकला.