ब्रिस्टल- आगामी विश्वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला ३ विकेट्सने हरवत आपले इरादे स्पष्ट केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर सर्व गड्यांच्या मोबदल्यात २६२ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानने ७ गडी गमावत धावांचा यशस्वी पाठलाग केला.
अफगाणिस्तानचा विश्वकरंडक स्पर्धेतील संघांना इशारा; सराव सामन्यात पाकवर ३ विकेट्सने मात - 3 wickets
आगामी विश्वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला ३ विकेट्सने हरवत आपले इरादे स्पष्ट केले.
या सामन्यात पाकिस्तानकडून खेळताना फलंदाज बाबर आझमने सर्वोच्च खेळी केली, त्याने १०८ चेंडूत ११२ धावा जमवल्या. याव्यतिरीक्त शोएब मलिकने ४४ तर इमाम उल हकने ३२ धावांची खेळी केली. विश्वकप स्पर्धेसाठी अनपेक्षितरित्या संघात निवड झालेल्या वहाब रियाजने ४६ धावा देत ३ बळी घेतले. इमाद वसिमने २९ धावांच्या मोबदल्यात २ तर मोहम्मद वसिमने १ बळी घेतला.
याउलट अफगाणिस्तानच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन केले. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना हश्मतुल्ला शाहिदीने ७४ धावांची नाबाद खेळी केली. त्याला साथ देताना हजरतुल्ला झाझाईने ४९ तर मोहम्मद नबीने ३४ धावा केल्या.या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले.मोहम्मद नबीने ४६ धावा देत ३ बळी घेतले.राशिद खानन आणि दौलत झादरान यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.