दुबई -भारतासह अनेक मातब्बर संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या झिम्बाब्वे संघाचे निलंबन अखेर आयसीसीने मागे घेतले. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झिम्बाब्वेसोबत नेपाळच्या क्रिकेट संघालाही आयसीसीने सदस्यत्व बहाल केले आहे. जुलैच्या २०१९ मध्ये झिम्बाब्वे संघाचे सदस्यत्व काढून घेण्यात आले होते.
हेही वाचा -'त्या १००० बेरोजगार क्रिकेटपटूंची जबाबदारी कोणाची?', पाकच्या खेळाडूचाच पीसीबीवर हल्लाबोल
आयसीसीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. 'मी झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्र्यांचे आभार मानतो. या संघाने क्रिकेटमध्ये चांगले योगदान दिले आहे. या संघाचे फंडिंग सुरू राहिल', असे आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी सांगितले. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ विश्वकरंडक स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ भाग घेणार आहे.
'आयसीसीच्या सर्व अटी झिम्बाब्वेने मान्य केल्या आहेत. या संघाच्या प्रगतीसोबतच नेपाळ क्रिकेटही आपल्या योजना तयार ठेवतील. त्यांनाही आयसीसी फंडिंग करेल', असेही शशांक मनोहर यांनी म्हटले. आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेटवर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात होती. लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेत होत असलेली अनियमितता लक्षात घेत आयसीसीच्या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता.