दुबई - मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेत बलाढ्य संघ मानला जातो. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने तब्बल चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दरवर्षी, मुंबईचा संघ मोठ्या जोशाने या स्पर्धेत खेळतो. काही हंगामात पहिल्यांदा सलग पराभव पदरी पडूनही हा संघ स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये दाखल झालेला आपण पाहिला आहे. यंदाही मुंबईची सुरुवात काही खास झाली नाही. मागील तीन सामन्यात मुंबईला फक्त एक विजय मिळाला आहे. त्यामुळे संघ नव्या खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मात्र, सर्वांची नजर मराठमोळ्या दिग्विजय देशमुखकडे लागली आहे.
मुंबईच्या संघात दिग्विजय माजी गोलंदाज झहीर खानच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. मुंबईच्या संघाने या दोघांमधील मराठीतील चर्चेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओत झहीर बीडच्या या प्रतिभावान खेळाडूला गोलंदाजीचे धडे देताना दिसून येत आहे.
आयपीएल-२०२०साठी निवडण्यात आलेल्यांमध्ये 'काई पो चे' चित्रपटातील कलाकार दिग्विजय देशमुखची संघात एन्ट्री झाली. मुंबई इंडियन्सच्या संघाने २० लाखांची बोली लावून दिग्विजयला आपल्या संघामध्ये स्थान दिले. २१ वर्षीय दिग्विजयने 'काई पो चे' या चित्रपटात 'अली'ची भूमिका साकारली होती. त्यावेळी तो १४ वर्षांचा होता. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती. सध्या तो वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळतो.
दिग्विजय देशमुखची संक्षिप्त ओळख -
दिग्विजय देशमुख हा मूळचा बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील वरप गावचा आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ९ बळी घेतले होते. त्याला फक्त दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने एकवेळा १९ आणि दुसऱ्या वेळी १२ धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीमध्येही त्याने ६ बळी आणि ६१ धावा पूर्ण केल्या होत्या. हा सामना जम्मू-काश्मीर विरुद्ध खेळण्यात आला होता. दिग्विजयशिवाय मोहसीन खान, प्रिन्स बलवंत राय सिंग, नाथन कुल्टर नाइल आणि क्रिस लिन यांचाही मुंबई इंडियन्स संघात समावेश झाला आहे.