ऑकलंड - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जागा कोण घेणार, या चर्चांना ऊत आला आहे. धोनीचा पर्याय म्हणून ऋषभ पंतकडे पहिले जात आहे. मात्र, त्याला वारंवार संधी मिळूनही आपली छाप सोडता आलेली नाही. धोनीला पर्याय मिळेपर्यंत या चर्चा तर होणारच आहेत, पण अद्याप धोनीची बसमधील जागा मात्र रिकामीच आहे. बीसीसीआयने भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यात चहल धोनीची बसमधील जागा रिकामी असल्याचे सांगताना दिसत आहे.
बीसीसीआयच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघ बसमध्ये बसून ऑकलंडहून हेमिल्टनला जाताना दिसत आहे. या प्रवासादरम्यान, चहल संघातील खेळाडूंसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडिओत तो सुरूवातीला जसप्रीत बुमराहशी बातचित करतो. त्यानंतर तो ऋषभ पंत, मोहम्मद शमी, केएल राहुल आणि कुलदीप यांच्याशी चर्चा करतो.
व्हिडिओच्या चहल शेवटी त्या सीटपर्यंत जातो, जेथे धोनी बसायचा. चहल त्या सीटकडे इशारा करत म्हणतो, 'येथे लीजंड बसायचा, माही भाई, आताही येथे कोणी बसत नाही. आम्ही त्याला खूप मिस करतो.'