हैदराबाद -भारताचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हैदराबादमध्ये पार पडलेल्या विंडीजविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात मोठी कामगिरी केली. या सामन्यात त्याने विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डला बाद करत रविचंद्रन अश्विनच्या टी-२० मधील मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
हेही वाचा -श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 'या' खेळाडूचे १० वर्षानंतर पुनरागमन
टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक बळी नोंदवण्याच्या विक्रमात चहलने रविचंद्रन अश्विनची बरोबरी केली. चहल आणि अश्विन आता गोलंदाजांच्या यादीमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी ५२ बळी जमा आहेत. येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात चहलने ही कामगिरी केली.
चहलने या सामन्यात दोन गडी बाद केले. त्याने प्रथम रोहित शर्माकरवी शिम्रॉन हेटमायरला माघारी धाडले. त्यानंतर त्याने पोलार्डला बाद केले. चहलने आठव्या षटकातील पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर हे दोन्ही बळी घेतले. हेटमायरने ४१ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. तर, पोलार्डने १९ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारांच्या मदतीने ३७ धावा चोपल्या आहेत.
या सामन्यात भारताने ६ गडी आणि ८ चेंडू राखून हा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ९४ धावा आणि लोकेश राहुलच्या ६२ धावांमुळे भारताने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.