नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक स्पर्धकामधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी केवळ या दोन देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. भारत-पाकिस्तान सामन्याला क्रिकेटप्रेंमीची नेहमीच गर्दी होते. पण राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने गेली अनेक वर्षे बंद आहेत. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढतात. दरम्यान या विषयावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने मत व्यक्त केले असून त्याने भारत-पाक यांच्यात जास्तीत जास्त क्रिकेट स्पर्धा झाल्या पाहिजेत, असं म्हटलं आहे.
याबाबत युवराज म्हणाला की, 'मला पाकिस्तान विरुद्धच्या २००४, २००६ आणि २००८ मधील द्विपक्षीय मालिका आठवतात. पण मागील काही वर्षांमध्ये या दोन देशात क्रिकेट सामना होत नाही. परंतु ही गोष्ट आमच्या हातात नाही. आम्हाला क्रिकेट आवडतं. यामुळे आम्ही क्रिकेट खेळतो. पण कोणत्या देशाविरुद्ध खेळायचे हे आम्ही ठरवू शकत नाही. भारत-पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध खेळले तर ते क्रिकेटसाठी चांगले असेल.'
दरम्यान युवराजसह पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने देखील दोन्ही संघामध्ये क्रिकेट सामने खेळली जावी, असे म्हटले आहे. भारत-पाक यांच्यात मालिका झाल्यास तिला अॅशेसपेक्षा मोठा प्रतिसाद मिळतो. पण आपल्याकडे खेळात राजकारण आणले जाते, असे आफ्रिदीने म्हटले आहे. भारत-पाक यांच्यात २०१३ मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली होती.