मुंबई- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोरोनामुळे पीडित असलेल्यांना आणि गरजू लोकांना मदत करत आहे. आफ्रिदीच्या या प्रयत्नांना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दिला. पण, ही बाब भारतीय चाहत्यांना रुचली नाही. त्यांनी सोशल मीडियावर या दोघांनाही ट्रोल केले. अनेकांनी तर तुम्हाला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे भारतात #ShameOnYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. आता या प्रकरणावर युवीने उत्तर दिले आहे.
युवीने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'मला हे कळत नाही, की मी जो मॅसेज केला होता, तो गरजूंना मदत मिळावी यासाठी होता. त्याला चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे. माझा हेतू कोणाच्या भावना दुखवायचा नव्हता. कोरोनामुळे पीडित असलेल्या गरजूंना मदत मिळो, हाच हेतू माझा होता. मी एक भारतीय आहे आणि मी नेहमी मानवतेसाठी उभा राहीन. जय हिंद.'