चंदीगड -भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. युवराज सिंगविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मागील वर्षी रोहित शर्माशी 'इन्स्टाग्राम'वर साधलेल्या संवादादरम्यान युवराजने मस्तीच्या भरात फिरकीपटू युझवेंद्र चहलला उद्देशून जातीवाचक शब्द उच्चारले होते. यासंदर्भात हिसारच्या हांसी पोलीस स्टेशनमध्ये ही एफआयआर नोंदविण्यात आली होती. मात्र, त्याने एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने हरयाणा सरकार आणि तक्रारदाराला नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ वकील पुनीत बाली यांनी युवराजच्या वतीने बाजू मांडली.
काय आहे प्रकरण -
युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता.