मुंबई- भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केल्याबद्दल माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने माफी मागितली आहे. रोहित शर्माशी 'इन्स्टाग्राम'वर साधलेल्या संवादा दरम्यान युवराजने मस्तीच्या भरात चहलला उद्देशून जातीवाचक शब्द उच्चारले होते. यावर मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याने युवीविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर युवीने शुक्रवारी आपली बाजू मांडली. माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो, असे युवी म्हणाला.
काय आहे प्रकरण -
युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच युवराजच्या प्रतिक्रियेविरुद्ध हरियाणाचे सामाजिक कार्यकर्ते आणि न्यायाधीश राजत कालसन यांनी तक्रार नोंदवली आहे. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही बुधवारी व्हायरल झाला होता.
यानंतर युवीने शुक्रवारी आपली बाजू मांडली. त्याने, माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचे कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो. मला जातीवाचक टीका टिप्पणी करण्यात काहीही रस नाही. रोहितशी झालेल्या त्या संवादादरम्यान माझ्या शब्दांचा उलट अर्थ काढण्यात आला. परंतु माझ्या या कृत्यामुळे चहल व्यतिरिक्त अन्य कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो, असे ट्वीट केले.
दरम्यान, युवीविरोधात तक्रार दाखल करताना कालसन यांनी रोहितवरही टीका केली. रोहितने युवीच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. युवीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ३०४ एकदिवसीय, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
हेही वाचा -''कसोटीच्या इतिहासातील विध्वंसक सलामीवीर'', लक्ष्मणने केले सेहवागचे कौतुक
हेही वाचा -गुड न्यूज..! क्रिकेटपटूची कोरोनावर मात