लाहोर -कोरोनाची चाचणी झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपले 20 क्रिकेटपटू ऐतिहासिक मालिकेसाठी इंग्लंडला रवाना केले आहेत. त्यांच्यासोबत पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक युनिस खानही आहे.
या दौऱ्याला जाण्यापूर्वी, युनिसने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याचे सामान दिसत आहे. ''फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पाक संघाबरोबर एक नवा प्रवास सुरू होत आहे. आम्ही इंग्लंडला रवाना होत आहोत. या कठीण काळात आम्हाला आठवणीत ठेवा'', असे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
पाकिस्तानला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. कसोटी संघाचे नेतृत्व अझर अलीकडे देण्यात आले आहे. तर, बाबर आझम संघाचा उप-कर्णधार असेल. तत्पूर्वी, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) रविवारी पाकिस्तान संघाच्या आगमनची पुष्टी केली होती. परंतु, मालिकेच्या तारखेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही मालिका प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल.
पाकिस्तान संघ -अझर अली (कर्णधार), बाबर आजम, आबिद अली, असद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इप्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम उल हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मुसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शेनवारी आणि यासिर शाह.