मुंबई -भांडूपमध्ये गुरुवारी तीन अज्ञातांनी तीक्ष्ण शस्त्रांने केलेल्या हल्ल्यात स्थानिक युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. राकेश अंबादास पवार असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. हल्ला हा पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत युवा क्रिकेटपटूची निर्घृण हत्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये राकेश पवार चमकदार कामगिरी करीत होता. तो गुरुवारी रात्री भांडूपमधील एका पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर तीन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी राकेशवर धारदार शस्त्रांनी वार केले. यानंतर राकेशला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी स्थानिक युवक मोठया संख्येने भांडुप पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत जमा झाले होते.
मुंबई शहर व उपनगरात हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच घाटकोपरमधील दुबेची हत्या, साकीनाका, गोवंडी येथील गोळीबार हे प्रकरण ताजे असतानाच आता हे हत्येचे लोण भांडुपजवळ पोहचले आहे. स्थानिक क्रिकेटपटू व लहान मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देणारा युवा क्रिकेटपटू राकेश पवार यांची डोक्यात धारदार लोखंडी शस्त्राने घाव घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली होती.
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये राकेश पवार चमकदार कामगिरी करत होता. तो गुरुवारी रात्री भांडूपमधील एलबीएस रोडवरील महावीर पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि आवाज देऊन राकेशला थांबवले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार हत्यारांनी हल्ला करून तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. राकेशचा काही लोकांसोबत वाद होता. हल्ला झाला त्यावेळी राकेशसोबत त्याची मैत्रीण होती, अशी माहिती राकेशचा मित्र गोविंद राठोडने दिली. या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, जुन्या वादातूनच हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.