माउंट माउंगानुई -न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. यजमान न्यूझीलंडने या सामन्यात, पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २२२ धावा केल्या आहेत. शाहीन शाह आफ्रिदीने सुरूवातीला टॉम लॅथम (४) आणि टॉम ब्लंडल (५) यांना माघारी धाडत न्यूझीलंडची अवस्था २ बाद १३ अशी केली होती. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर आणि हेन्री निकोलस यांनी चिवट खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना नाकीनऊ आणले.
न्यूझीलंडची अवस्था २ बाद १३ अशी झाल्यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यमसन या दोघांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या गड्याठी १२० धावांची भागिदारी केली. टेलरने १५१ चेंडूत १० चौकारासह ७० धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडची ही जोडी शाहीन शाह आफ्रिदीने टेलरला बाद करत फोडली. यानंतर विल्यमसन आणि हेन्री निकोलस या दोघांनी पाकच्या गोलंदाजांना दमवलं. पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शहा निकोलसला गोलंदाजी करताना इतका कंटाळला की वैतागून त्याच्या तोंडातून आऊट हो जा भूतनी के…असे शब्द बाहेर पडले.
हा प्रसंग डावाच्या ७७ व्या षटकादरम्यान घडला. तीन गडी बाद झाल्यानंतर विल्यमसन आणि निकोलस यांनी ६४ धावांची भागिदारी केली होती. ७७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निकोलसने कट शॉट मारला. तेव्हा यासिरने हिंदीमध्ये निकोलस यांना सुनावले. त्यावेळी निकोलस ६१ चेंडूत २७ धावांवर खेळत होता. यामुळे यासिर शाह वैतागला होता.