दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफस्ट्रम येथे झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला तीन गड्यांनी धूळ चारली.
हेही वाचा -धोनी, विराट नव्हे तर.... इयान मॉर्गन ठरला सर्वोत्कृष्ट कर्णधार!
या संघातील तीन भारतीय खेळाडूंमध्ये सलामीवीर यशस्वी जयस्वाल, लेगस्पिनर रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांचा समावेश आहे. समालोचक इयान बिशप, रोहन गावस्कर, नटाली जर्मनोस आणि ईएसपीएन क्रिकइन्फोचे संवाददाता श्रेष्ठ शाह आणि आयसीसीची प्रतिनिधी मेरी गडबीर यांच्या समितीने ही निवड केली.
या स्पर्धेत यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बांगलादेशविरूद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने ८८ धावांची संघर्षमय खेळी साकारली. जयस्वालने स्पर्धेच्या सहा डावांमध्ये १३३ च्या सरासरीने ४०० धावा केल्या.
त्याचबरोबर फिरकीपटू बिश्नोईने स्पर्धेच्या सहा सामन्यात सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या. त्याने अंतिम सामन्यात ३० धावा देऊन ४ बळीही टिपले. बिश्नोई व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज त्यागीचादेखील यात समावेश आहे. त्यागीने या स्पर्धेत एकूण ११ बळी घेतले.
संघ - यशस्वी जयस्वाल (भारत), इब्राहिम झादरान (अफगाणिस्तान), रवींदू रंसथा (श्रीलंका), महमूदुल हसन जॉय (बांगलादेश), शहादत हुसेन (बांगलादेश), नईम योंग (वेस्ट इंडीज), अकबर अली (बांगलादेश), शफिकुल्ला गफारी (अफगाणिस्तान), रवी बिश्नोई (भारत), कार्तिक त्यागी (भारत), जैदेन सील्स (वेस्ट इंडीज), अकिल कुमार (कॅनडा).