ढाका- कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मायदेशात होणारी आशिया एकादश आणि विश्व एकादश यांच्यातील टी-२० मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उभय संघात २ सामन्याची मालिका २१ आणि २२ मार्चला खेळवण्यात येणार होती. परंतु, कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रभावामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दोनही सामने पुढे ढकलले आहेत. दरम्यान, या मालिकेचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त करण्यात येणार आहे.
बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याविषयी सांगितले की, 'कोरोनाच्या धोक्यामुळे मालिकेत खेळाडू सहभागी होतील की नाही, याची आम्हाला खात्री नाही. तसेच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे आयोजनाबाबत आम्ही एक महिन्यांनी परिस्थिती विचार करु. पण सद्या ही मालिका स्थिगित करण्यात आली आहे.'
बांगलादेशच्या बोर्डाने ढाका प्रीमियर लीगच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे समजते. आशिया एकादश संघात विराट कोहलीसह कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, ऋषभ पंत आणि केएल राहुल या सहा खेळाडूंचा समावेश आहे.