मुंबई - ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारून पराभव झाला. भारताच्या या पराभवानंतर संघाची उपकर्णधार मराठमोळी स्मृती मानधानाने चाहत्यांची माफी मागितली आहे.
भारतीय संघाने ग्रुप फेरीतील चारही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तेव्हा भारतीय संघ अ गटातून अव्वल असल्याने, तो थेट अंतिम फेरीत पोहोचला. भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे चाहत्यांना पहिल्या विजेतेपदाची आशा होती. पण अंतिम सामन्यात भारताला दारून पराभव पत्कारावा लागला.
भारताच्या या पराभवानंतर स्मृतीने सोशल मीडियावरून चाहत्यांची माफी मागितली. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, 'एमसीजीवर झालेल्या अंतिम सामन्यात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला त्याबद्दल मी सर्व चाहत्यांची माफी मागते. पण तुमचा हाच पाठिंबा आम्हाला पुढे जाण्याची हिम्मत देतो.'