शारजाह - महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेत स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने मिताली राजच्या वेलॉसिटी संघाचा दारूण पराभव केला. मागील सामन्यात वेलॉसिटीने गतविजेत्या सुपरनोव्हाजवर विजय मिळवत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली होती. पण त्यांना दुसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने ९ गडी राखून पराभूत केले. ट्रेलब्लेझर्सच्या माऱ्यासमोर वेलॉसिटी संघाचा डाव ४७ धावांत संपुष्टात आला. तेव्हा ट्रेलब्लेझर्सने हा सामना 7.5 षटकात एका गड्याचा मोबदल्यात सहज जिंकला. दरम्यान, महिला टी-२० स्पर्धेतली ही निचांकी धावसंख्या ठरली.
वेलॉसिटीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा अनुभवी झुलन गोस्वामीने शेफाली वर्माचा १३ धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर वेलॉसिटीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. डॅनी वॅट, मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, सुषमा वर्मा अशा सर्व नावाजलेल्या फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्या. ट्रेलब्लेझर्सकडून सोफी एस्कलस्टोनने ४, झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी २-२ तर दिप्ती शर्माने १ बळी घेतला.