दुबई -२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तब्बल २४ वर्षांनी इतिहास घडणार आहे. या स्पर्धेत महिलांच्या टी-२० क्रिकेटचा समावेश झाला असून यात आठ संघ सहभागी होणार आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात २०२२ च्या २७ जुलैपासून होणार आहे. या स्पर्धेच्या १८ क्रीडा प्रकारांमध्ये ४५,००० खेळाडू भाग घेणार आहेत. महिलांच्या क्रिकेटचे सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळले जाणार असून हे सामने आठ दिवस खेळवले जाणार आहेत.
१९९८ नंतर पहिल्यांदा क्रिकेटला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले आहे. १९९८ मध्ये झालेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. सीजीएफचे अध्यक्ष लुईस मार्टिन म्हणाले, 'आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे परत एकदा स्वागत आहे.'
मार्टिन पुढे म्हणाले, 'क्वालालंपूर येथे झालेल्या १९९८ मधील स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यात जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.'
'महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकाराला चांगले बनवण्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगले व्यासपीठ आहे', असेही मार्टिन म्हणाले आहेत.