मेलबर्न - ब्रिस्बेन हिट महिला संघाने बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात एडिलेड स्ट्रायकरचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. ब्रिस्बेन हिटने सलग दुसऱ्यांदा हि स्पर्धा जिंकली. या विजेतेपदासह ब्रिस्बेनने सिडनी सिक्सर्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सिडनी सिक्सर्सने दोनदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
अंतिम सामन्यात एडिलेड स्ट्रायकरने प्रथम फलंदाजी करत अमांडा जेड वेलिंग्टनच्या ५५ धावांच्या जोरावार निर्धारीत २० षटकात ७ बाद १६१ धावा केल्या. स्ट्रायकरचे हे लक्ष्य ब्रिस्बेन हिटने १८.१ षटकात ४ गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर बेथ मूनी हिने ४५ चेंडूत ५६ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. मूनीला जेस जोनासेन हिने ३३ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
मूनीला शानदार खेळीमुळे सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर एडिलेड स्ट्रायकरची सोफी डिव्हाईनने (१६ सामन्यात ७६९ धावा) मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. बिग बॅश लीग २०१९ च्या हंगामाला ८ ऑक्टोंबरला सुरूवात झाली होती. ही स्पर्धा तब्बल २ महिने रंगली आणि यात ५६ सामने खेळवण्यात आले.