मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हिलीने भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत अवघ्या ३० चेंडूत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. हिलीचे हे अर्धशतक आयसीसीच्या स्पर्धेच्या (पुरुष आणि महिला) अंतिम फेरीतील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेगन लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडी एलिसा हिली आणि बेथ मूनीने ११५ धावांची सलामी दिली. याच सलामीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १८५ धावांचा डोंगर उभारता आला.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने डावाच्या पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला. एलिसा हिलीने भारताच्या दीप्ती शर्माचे स्वागत चौकाराने केले. हिली आणि बेथ मूनी या जोडीने दीप्ती शर्माच्या पहिल्या षटकात १४ धावा चोपल्या. पण, या षटकाच्या पाचव्याच चेंडूवर शफाली वर्माने हिलीचा सोपा झेल सोडला. जीवदान मिळाल्यानंतर हिलीने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. तिने दीप्तीच्या दुसऱ्या षटकात ९ धावा फटकावल्या. चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिच्याच गोलंदाजीवर बेथ मूनीचा सोपा झेल सोडला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या ६ षटकात म्हणजे, पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४९ धावा केल्या. एका बाजूने हिली जोरदार फटकेबाजी करत होती. तर दुसऱ्या बाजू मूनीने पकडून ठेवली. हिलीने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. तिला राधा यादवने वेदाकडे झेल देण्यास भाग पाडलं. हिलीने हिलीने ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकाराच्या मदतीने ७५ धावा चोपल्या.
हिली बाद झाल्यानंतर दीप्ती शर्माने एका षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. कर्णधार मेन लॅनिंग १६ धावांवर शिखा पांडेकडे झेल देऊन बसली. तर एश्ले गार्डनरला (२) तानिया भाटियाने यष्टीचित केलं. त्यानंतर मूनीने खिंड लढवत अर्धशतक झळकावलं. शेवटी पूनम यादवने १९ व्या षटकात राचेल हायनेसला (४) बाद केले. यानंतर अखेर भारताला ऑस्ट्रेलियाला १८४ धावांवर रोखता आले. मूनी ७८ धावांवर नाबाद राहिली. भारताकडून दीप्तीने २ तर पूनम आणि राधा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.