मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. पहिल्यादांच ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. ८ मार्चपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत १० संघामध्ये २३ सामने खेळली जाणार आहेत. आतापर्यंत सहा वेळा विश्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात ऑस्ट्रेलियाने ४ तर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघाने प्रत्येकी १-१ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
अशी आहे भारताची विश्व करंडकाती कामगिरी -
भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही या स्पर्धेची अंतिम फेरीत गाठता आलेली नाही. भारतीय संघ २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाला. थायलंड यंदा पहिल्यादांच विश्व करंडक खेळणार आहे. या स्पर्धेत पायाचा नो-बॉल (फ्रंट फुट) मैदानातील पंचांऐवजी तिसरे पंच देणार आहेत.
आयसीसी महिला टी-२० विश्व करंडकासह सर्व संघांचे कर्णधार.... (फोटो साभार... T20 World Cup twitter) प्रत्येक ग्रुपमध्ये ५ संघांचा समावेश -
टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी १० संघांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. या ग्रुपमधील सर्व संघ एक-दुसऱ्यासोबत सामाना खेळतील. एक संघ लीग फेरीत चार सामने खेळेल. प्रत्येक ग्रुपमधील २ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन उपांत्य सामने ५ मार्चला तर अंतिम सामना ८ मार्चला खेळला जाणार आहे.
विश्व करंडक स्पर्धेसाठी ग्रुप आणि संघ -
ग्रुप ए - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश
ग्रुप बी - इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि थायलंड
आयसीसी महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेतील सर्व संघांचे कर्णधार....(फोटो साभार... T20 World Cup twitter) भारतीय संघासमोर कोणाचे आव्हान -
टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत दोन संघाला जागा मिळेल. यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड संघाला पराभूत करणे गरजेचे आहे.
भारताची ग्रुपमधील विरोधी संघाविरुद्धची कामगिरी -
भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्व करंडक स्पर्धेत ३ वेळा समोरासमोर आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने दोन तर भारताने एक वेळा विजय मिळवला आहे. न्यूझीलंड-भारत यांच्यात ३ सामने झाले आहेत. यात भारताने एक तर दोन वेळा न्यूझीलंड विजयी ठरला आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील ४ सामन्यापैकी भारताने ३ विजय मिळवले आहेत. बांगलादेशला भारताने झालेल्या दोन सामन्यात पराभूत केले आहे.
गोलंदाजीत कोणाचा बोलबाला -
टी-२० विश्व करंडकामध्ये गोलंदाजीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाची एलिस पेरीने सर्वाधिक ३६ गडी बाद केले आहेत. तर भारताकडून फिरकीपटू पूनम यादवने १८ गडी टिपले आहेत. विश्व करंडकाच्या इतिहासात आतापर्यंत एका डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा चार गोलंदाजांनी केला आहे. यात भारताची प्रियंका रॉयचा समावेश आहे. तिने २००९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना हा विक्रम केला होता.