नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लेनिंगने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान १३ शतके करण्याचा विक्रम नोंदविला आहे. लेनिंगने केवळ ७६ डावांमध्ये हा पराक्रम करत विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि स्टीव स्मिथ यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले.
हेही वाचा -..असा विक्रम करणारा राशिद खान पहिलाच कर्णधार
गुरुवारी अँटिगा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. हे तिच्या कारकीर्दीचे १३ वे शतक होते. महिला आणि पुरुष क्रिकेट संघामध्ये कोणत्याही वेगवान खेळाडूने या वेगाने एकदिवसीय सामन्यात १३ शतके ठोकली नव्हती. लेनिंगने दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमलाला मागे सोडले, त्याने ८३ डावांमध्ये १३ एकदिवसीय शतके ठोकली होती. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने १३ शतके ठोकण्यासाठी ८६ डावांचा सामना केला होता. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा विक्रम लेनिंगच्या नावावर आहे.