मुंबई - वेस्ट इंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आयपीएलच्या २०१७ च्या हंगामात निकोलस पूरनला मुंबई इंडियन्सने ३० लाखांची बोली लावून विकत घेतले होते.
हेही वाचा -Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद
या गुन्ह्यासाठी पूरनने जाहीरपणे माफी मागितली आहे. पूरन यापुढे होणारे चार सामने खेळू शकणार नाही. शिवाय, त्याच्या खात्यात पाच डिमेरिट गुण जोडले गेले आहेत.
तिसरा एकदिवसीय सामना सोमवारी लखनौमध्ये खेळला गेला होता. 'निकोलस पूरनला खेळाडू आणि सहायक कर्मचारी यांचा समावेश असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे कबूल केल्याबद्दल चार निलंबन गुण देण्यात आले आहेत', असे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे.
'मला हे कळले आहे की, निर्णय घेताना मी खूप मोठी चूक केली आहे आणि आयसीसीची शिक्षा मी पूर्णपणे स्वीकारतो. मला सर्वांना खात्री करून द्यायची आहे की, ही एकमेव घटना आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही', असे पूरनने माफी मागताना म्हटले आहे.