एंटीगा - वेस्ट इंडीज संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, उभय संघातील टी-२० मालिका विंडीज संघाने २-१ अशा फरकाने जिंकली होती.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ४९ षटकात सर्वबाद २३२ धावांपर्यंत मजल मारता आली. दनुष्का गुणतिलका याने ६१ चेंडूत सर्वाधिक ५५ धावा केल्या. तर कर्णधार दिमुख करुणारत्ने (५२) आणि एशन बंडारा या दोघांनी (५०) देखील अर्धशतक झळकावत आपलं योगदान दिलं. विंडीजकडून जेसन होल्डर आणि जेसन मोहम्मद यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर केरॉन पोलार्ड, फॅबियन एलन आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.