नवी दिल्ली -क्रिकेट विश्वातील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणाऱ्या जॅक कॅलिसने आज ४४ वर्षात पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि उत्तम गोलंदाज अशी ओळख असणाऱ्या कॅलिसचा जन्म केपटाऊनमध्ये झाला. त्याने तब्बल १९ वर्षे आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले.
हेही वाचा -इंग्लंडला ३ वेळा विश्वकरंडक जिंकून देणारी अष्टपैलू खेळाडू जेनी गूनने घेतली निवृत्ती
१५ वर्षाचा असताना कॅलिसला आपल्या उंचीचा फटका बसला होता. अंडर १५ च्या संघामध्ये त्याची या कारणामुळे निवड झाली नव्हती. कॅलिस हा त्याच्या वडिलांचा फार लाडका होता. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे क्रिकेट खेळताना कॅलिस ६५ क्रमांकाची जर्सी घालत होता. वडिलांच्या आजारपणात कॅलिसने त्यांची खूप सेवा केली. त्यांच्या निधनानंतर कॅलिसने काही काळासाठी क्रिकेटला रामराम ठोकला होता.
कॅलिसने १६६ कसोटी सामने खेळताना ५५.३७ च्या सरासरीने १३२८९ धावा चोपल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ४५ शतके आणि ५८ अर्धशतके जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३२८ सामन्यांतून ४४.३६ च्या सरासरीने ११५७९ धावा केल्या आहेत. त्यामध्ये कॅलिसने १७ शतके आणि ८६ अर्धशतके ठोकली आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा आणि २०० पेक्षा जास्त बळी घेणारा कॅलिस हा एकमेव फलंदाज आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी सोहबतच कॅलिस क्षेत्ररक्षणातही उत्तम खेळाडू मानला जात होता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २०० तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३१ झेल घेतले आहेत. या सर्व आकडेवारीमुळे त्याच्या महानतेची कल्पना येते.