ढाका - 'क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं', असं म्हणतात. त्याचाच प्रत्यय बांगलादेशमधील एका क्रिकेटच्या सामन्यात आला. या सामन्यात तब्बल ४८ षटकार, ७० चौकार लगावले गेले. शिवाय, दोन्ही संघांची एकूण धावसंख्या ८१८ धावा अशी नोंदवली गेली.
हेही वाचा -ICC U-१९ World Cup २०२० : ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून टीम इंडिया उपांत्य फेरीत
बांगलादेशच्या दुसर्या विभागातील संघानं ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये हा अविश्वसनीय विक्रम नोंदवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नॉर्थ बंगाल क्रिकेट अकादमी संघानं ४ गडी गमावत ४३२ धावा ठोकल्या. या डावात नॉर्थ बंगालच्या संघानं तब्बल २७ षटकार लगावले.
या धावांचा पाठलाग करणाऱ्या टॅलेंट हंट क्रिकेट अकादमीनं ही धावांचा पाऊस पाडत २१ षटकार ठोकले. मात्र, टॅलेंट हंट संघाला विजय मिळवण्यात अपयश आलं. नॉर्थ बंगालच्या संघाने हा सामना ४६ धावांनी जिंकला.
'हा अनोखा सामना होता. मी खूप वर्षांपासून स्थानिक क्रिकेट पाहत आलो आहे. मात्र, असा सामना मी आधी कधीच पाहिला नव्हता', असे या सामन्याच्या आयोजकांनी म्हटले आहे.