अबुधाबी -शेख झायेद स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्कारली. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताचा डाव बंगळुरूच्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत कोलकाताची दाणादाण उडवली. यात सिराजने ८ धावांत ३ विकेट घेत कोलकाताची कंबर मोडली. या कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सामना संपल्यानंतर बोलताना सिराज म्हणाला, या प्रदर्शनासाठी मी अल्लाहचे आभार मानू इच्छितो. यानंतर विराटचे आभार, कारण त्याने मला नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली. मी नव्या चेंडूवर गोलंदाजीचा भरपूर सराव करत होतो. पण, कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मला नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास मिळेल असे वाटले नव्हते. तसेच यासंदर्भात कोणतीही रणणिती आखण्यात आलेली नव्हती. पण मला विराटने अचानक सांगितले, मियां रेडी हो जाओ.