कराची -पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीच्या वक्तव्यामुळे आफ्रिदी चर्चेचा विषय ठरत आहे. 'नरेंद्र मोदींची मानसिकता नकारात्मक आहे आणि जोपर्यंत ते पंतप्रधानपदी राहतील तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुधारणार नाहीत', असे आफ्रिदी म्हणाला.
हेही वाचा -महान फलंदाज.. विक्रमांचा बादशहा, 'नाईटहूड' आणि बरंच काही..
क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबद्दल भाष्य केले. 'मोदी जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत भारताकडून काही प्रतिसाद मिळेल असे मला वाटत नाही. आपल्या सर्वांनाच, अगदी भारतीयांनादेखील मोदी काय विचार करतात हे माहित आहे. त्यांची विचारसरणी नकारात्मक आहे. फक्त एका माणसामुळे भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहेत', असे आफ्रिदी म्हणाला.
'सीमेच्या दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांच्या देशात फिरायचे आहे. मोदींनी काय करायचे आहे आणि त्याचा अजेंडा प्रत्यक्षात काय आहे हे मला माहिती नाही', असेही आफ्रिदी म्हणाला.
पाकिस्तानने २०१३ मध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताला अखेरची भेट दिली होती. २००६ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.