नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ, अक्षय दुल्लारवार आणि दिव्या गजराजवर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. नेमके डोपिंग काय प्रकार आहे. हे जाणून घेऊयात...
खेळाडू उत्तेजक पदार्थाचे सेवन करुन स्नायूंची आमि मज्जातंतूची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात. याचे दूरगामी परिमान खेळाडूच्या आरोग्यावरही होते. यामुळे डोपिंगची चाचणी घेतली जाते. ही चाचणी वाडा (वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी) आणि नाडा (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ) या एजन्सी करु शकतात.
कशी होते डोपिंग चाचणी -
महत्वपूर्ण बाब म्हणजे, कुठल्याही खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात येऊ शकते. ती कुठल्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षणादरम्यान घेतली जाऊ शकते. ही चाचणी ‘वाडा’ किंवा ‘नाडा’ कडून घेतली जाते. ही चाचणी खेळाडूचे रक्त आणि मूत्राचे नमुने घेऊन केली जाते. महत्वाचे म्हणजे, हे नमुने खेळाडूंसमोरच घेतले जातात आणि ते सिलबंद केले जातात आणि ते नमुने नाडाच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. तो खेळाडू ए चाचणीत दोषी आढळल्यास त्याचे तात्पुरते निलंबित केले जाते.
त्यानंतर तो खेळाडू बी चाचणीसाठी अपील करू शकतो. यावर या नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जाते. जर बी चाचणीतही खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षा केली होते.
डोपिंग प्रकरणात कोणती कारवाई होते -
डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास 'त्या' खेळाडूचे तात्पुरते निलंबन करण्यात येते. मात्र, त्या खेळाडूला आपली बाजू मांडण्याची यावेळी परवानगी देण्यात येते. काही वेळा खेळाडूला स्पर्धेतून कायमचे बाद ठरवण्यात येऊ शकते. तर काही वेळा दोन ते पाच वर्षासाठी किंवा आजीवन बंदीही लागू करण्यात येऊ शकते. तसेच खेळाडूने जिंकलेली पदके या चाचणीत दोषी आढळल्यास काढून घेतली जातात.