नवी दिल्ली -अँटिगामध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेला ३ गडी राखून पराभूत केले. यासह विंडीजने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या श्रीलंका संघाने ४ गडी गमावत १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १९ षटकांत ७ गडी गमावून हा सामना जिंकला. फॅबियन एलनला अष्टपैलू कामगिरीसाठी (१ बळी आणि नाबाद २१ धावा ) सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मधल्या फळीत अनुभवी दिनेश चंडिमलने ५४ आणि एशेन बंदाराने ४४ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. फॅबियन एलनने केवळ १३ धावा देऊन १ बळी घेतला.