महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय - Shai hope

शिमरन हेटमायर आणि सलामीवीर शाय होप यांनी दुसऱ्या गड्यासाठी २१८ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. या भागिदारीने वेस्ट इंडीजचा विजय सूकर झाला.

वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज

By

Published : Dec 15, 2019, 10:00 PM IST

Updated : Dec 16, 2019, 8:00 AM IST

चेन्नई- येथील एमए चिदंबरम स्टेडीयमवर रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने भारतावर आरामात विजय मिळवला. भारताने दिलेले २८८ धावांचे आव्हान वेस्ट इंडीजने ८ गडी राखून सहज पूर्ण केले. शिमरन हेटमायर आणि सलामीवीर शाय होप यांनी दुसऱ्या गड्यासाठी २१८ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. या भागिदारीने वेस्ट इंडीजचा विजय सूकर झाला. १३९ धावांची खेळी करणारा हेटमायर सामनावीर ठरला. त्याचे हे भारताविरूद्धचे दुसरे शतक आहे.

शिमरन हेटमायर (१३९) आणि शाय होप (नाबाद १०२) या दोघांनी शानदार शतके झळकावत भारतीय संघाचे मनसुबे उधळून लावले. संघाच्या ११ धावा झाल्या असताना पहिला गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर हेटमायर आणि होपने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. हेटमायरने १०६ चेंडूत ७ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने धडाकेबाज १३९ धावा केल्या. त्याला अखेर मोहम्मद शामीने श्रेयश अय्यर करवी झेलबाद केले. त्यानंतरही होपने 'होप' न सोडता मैदानावर तळ ठोकला होता. हेटमायर तंबूत परतल्यानंतर निकोलस पूरनच्या साथीने होपने मालिकेतील पहिला विजय वेस्ट इंडीजला मिळवून दिला. त्याने १५१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०२ धावा केल्या. होपचे हे आठवे एकदिवसीय शतक आहे.

हेही वाचा -India vs West Indies : भारताचे विंडीजसमोर २८८ धावांचे लक्ष्य, पंत-अय्यरने सावरलं

भारताकडून दीपक चहर आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिला बळी ११ धावांवर मिळवल्यानंतर दुसऱ्या बळीसाठी भारतीय गोलंदाजांना २२९ धावांपर्यंत वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने विंडीजसमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली, संघाची धावसंख्या २५ असताना दोन फलंदाज तंबूत दाखल झाले होते. तेव्हा अय्यर (७०) आणि पंत (७१) यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. त्यामुळे समाधानकारक आव्हान वेस्ट इंडीज समोर ठेवता आले.

Last Updated : Dec 16, 2019, 8:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details