एंटीगुआ - वेस्ट इंडीजचा संघ तीन सामन्याची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. याआधी संपूर्ण संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणांवरून खेळाडूंना एकत्रित आणण्यात आले. त्यानंतर त्यांना विशेष विमानाने इंग्लंडमधील मँचेस्टर येथे पाठवण्यात आले आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टरच्या ओल्ड ट्रँपर्ड येथे पोहोचल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात येईल. यानंतर त्यांची पुन्हा कोरोनाची तपासणी होईल. हे सर्व झाल्यावर विंडीज संघाच्या सात आठवड्याच्या दौऱ्याला सुरुवात करण्यात येईल.
उभय संघात तीन कसोटी सामने विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना ८ जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा १६ ते २० जुलै दरम्यान आणि तिसरा २४ ते २८ जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.