महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर एवर्टन वीक्स यांचे 95 व्या वर्षी निधन - वेस्ट इंडीज क्रिकेट न्यूज

वेस्ट इंडीज क्रिकेटमधील महान फलंदाज सर एवर्टन वीक्स यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. वेस्ट इंडीज क्रिकेटमधील महान असा 'थ्री डब्ल्यूज'मध्ये क्लाइड वालकॉट, फ्रैंक वॉरेल यांच्यासह सर एवर्टन वीक्स यांचा समावेश होता. त्यांनी वेस्ट इंडीजचे 1948 ते 1958 यादरम्यान प्रतिनिधीत्व केले.

Sir Everton Weekes
सर एवर्टन वीक्स

By

Published : Jul 2, 2020, 9:26 AM IST

Updated : Jul 2, 2020, 11:31 AM IST

सेंट जॉन्स-वेस्ट इंडीज किक्रेटमधील महान फलंदाज सर एवर्टन वीक्स यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. कॅरेबियन क्षेत्रात क्रीडा संस्कृती रुजवणाऱ्यांपैकी ते एक होते. सर एवर्टन वीक्स यांचा विंडीज क्रिकेट मधील 'थ्री डब्ल्यूज' मध्ये समावेश होता. क्लाइड वालकॉट, फ्रैंक वॉरेल यांच्यासह सर एवर्टन वीक्स यांचा डब्ल्यूज मध्ये समावेश होता.

“ आम्ही आमचा आदर्श गमावला आहे. महान फलंदाज सर एवर्टन वीक्स यांच्या निधनामुळे आम्ही दु:खी आहोत. वीक्स यांच्या आत्म्यास शांती मिळो,” असे ट्विट वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने केले आहे. वीक्स यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेटमधील थ्री डब्ल्यूजमध्ये क्लाइड वालकॉट, फ्रैंक वॉरेल यांच्यासह सर एवर्टन वीक्स यांचा समावेश होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ते विंडीज क्रिकेटचे प्रतिनिधीत्व करत होते. ब्रीजटाऊन मधील नॅशनल स्टेडियमला ‘थ्री डब्ल्यूज ओव्हल’ असे नाव देण्यात आले होते.

वीक्स यांचा1948 ते 1958 दरम्यान वेस्ट इंडीजच्या संघात फलंदाज म्हणून समावेश होता. वीक्स त्यांच्या कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले यामध्ये त्यांनी 4 हजार 455 धावा काढल्या. त्यांची सरासरी 58.61 एवढी होती. कसोटी सामन्यांमध्ये त्यांची 207 ही सर्वोच्च धावसंख्या होती.

वीक्स हे वेस्ट इंडीज क्रिकेटमधील अग्रणी होते, असे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिकी स्केरिर्ट्ट यांनी म्हटले आहे. वीक्स यांचे व्यक्तिमत्व अप्रतिम होते. ते खरोखरच आमच्या भागातील क्रिकेटचे अग्रणी होते. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, असे स्केरिट्ट यांनी म्हटले.

सर एवर्टन वीक्स यांच्यासोबत माझे वैयक्तिक संबंध होते. मागील वर्षी त्यांना भेटण्याची मला संधी मिळाली. गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर त्यांच्या बार्बाडोसमधील घरी आमची भेट झाली होती, असे स्केरिट यांनी सांगितले. यावेळी आमच्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीविषयी चर्चा झाली होती, असेही स्केरिट म्हणाले आहेत.

सर एवर्टन वीक्स यांच्या निधनाबद्दल जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी दु:ख व्यक्त केले आहे. भारताचा माजी कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, बिशनसिंग बेदी यांनी ट्विटरवरून वीक्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Last Updated : Jul 2, 2020, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details