लंडन - वेस्ट इंडीजचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अँटिगा येथून इंग्लंडला पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील ऐतिहासिक कसोटी मालिका 8 जुलैपासून सुरू होईल. कोरोनाच्या उद्रेकानंतर सुरू होणारी ही पहिली क्रिकेट मालिका असेल.
एका वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी हा संघ दोन चार्टर विमानांमध्ये इंग्लंडला रवाना झाला. यात खेळाडू आणि संघातील सहाय्यक कर्मचारी होते. याआधी संपूर्ण संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टरच्या ओल्ड ट्रँपर्ड येथे पोहोचल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात येईल. यानंतर त्यांची पुन्हा कोरोनाची तपासणी होईल. हे सर्व झाल्यावर विंडीज संघाच्या सात आठवड्याच्या दौऱ्याला सुरुवात करण्यात येईल.
उभय संघात तीन कसोटी सामने विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.
असा आहे वेस्ट इंडीजचा संघ -
जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, नक्रुमा बोनर, क्रॅग ब्रँथवेट, शमर ब्रूक्स, जॉन कैंपबेल, रोस्टन चेज, रकीम कॉर्नवाल, शेन डाउरिच, केमार होल्डर, शाय होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमार रोच.
रिझर्व्ह खेळाडू - सुनील अंबरीस, जोशुआ डासिल्वा, शॅनन गेब्रियल, किन हार्डिंग, काइल मेयर, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विनो मिंडले, शाइनी मोसले, एंडरसन फिलिप, ओशाने थॉमस आणि जोमेल वार्रिकान.