इंदूर -भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुवाहाटीच्या मैदानावर होणारा पहिला टी-२० सामना पावसाने वाया गेला. आज इंदूरच्या होळकर मैदानावर रंगणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात काय होणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, तत्पूर्वी हवामान विभागाने या सामन्यासाठी पावसाचा 'मूड' कसा आहे? याची माहिती दिली.
हेही वाचा -'तू मदत करशील का?'..शारापोव्हाच्या प्रश्नाला जोकोविचने दिलं 'हे' उत्तर
एका वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तानुसार, इंदूर येथे होणाऱ्या सामन्यात वातावरण स्वच्छ राहील आणि पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. 'सामन्यावेळी दवामुळे परिणाम होऊ नये. यासाठी तीन दिवसांपासून विशेष रसायन फवारले जात आहे. याशिवाय मैदानातील गवतावर पाणी मारलेले नाही. आम्हाला आशा आहे की, प्रेक्षकांना सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस बघायला मिळेल', असे एमपीसीएचे प्रमुख क्युरेटर समंदर सिंग चौहान यांनी सांगितले.
गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ या मैदानावर समोरासमोर उभे ठाकतील.