मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी तसेच खेळाडू करत आहेत. पण, लोकांनी याला प्रतिसाद दिला नाही. ते घराबाहेर पडत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. यानंतर देखील काही लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नाराजी व्यक्त केली आहे.
सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो, सरकार आणि डॉक्टर सर्वांना घरी राहण्यास सांगत आहेत. तरीदेखील मी असे ऐकतोय की काही लोक ही गोष्ट गंभिर्याने घेत नाहीत. यासंदर्भातील काही व्हिडिओ देखील मी पाहिले, ज्यात काही जण क्रिकेट खेळत आहेत. सर्वांना या काळात खेळण्याची आणि मित्रांना भेटण्याची इच्छा होत असेल. पण ही गोष्ट देशासाठी प्रचंड धोक्याची आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सुट्टी समजण्याची चुक तुम्ही करू नका, असे सांगताना दिसत आहे.
सचिन पुढे म्हणतो की, 'एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सर्व जण ऑक्सिजन आहोत आणि कोरोना विषाणू ही आग आहे. या विषाणूला पसरण्यापासून रोखायचे असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे या आगीच्या जवळ ऑक्सिजन पोहोचू द्यायचा नाही. याचा दुसरा अर्थ असा की घरातून बाहेर पडायचे नाही.'