मुंबई- कोरोना विषाणूच्या फैलावामुळे लोकांनी बाहेर गर्दी नये, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यामुळे लोक घरीच राहणे पसंत करत आहेत. भारतीय संघाचे खेळाडूही आपापल्या घरात, कुटुंबियांसोबत क्लालिटी टाईम घालवत आहेत. तर काही खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत आहेत. अशात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने जादू दाखवून घरात बसून कंटाळलेल्या लोकांचे मनोरंजन केले.
बीसीसीआय आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात श्रेयस आपल्या बहिणीसह पत्त्यांचा एक गेम खेळतो आहे. कोरोनामुळे मी घरीच आहे आणि घरात बसून बहिण नताशासह एक मॅजिक ट्रिक करत आहे, असे श्रेयस म्हणतो.
श्रेयस नताशाला पत्त्यांच्या कार्डमधील एक कार्ड निवडण्यास सांगतो. श्रेयसला न दाखवता नताशा एक कार्ड निवडते आणि इतर कार्डच्यामध्ये ठेवते. त्यानंतर श्रेयस ते कार्ड बरोबर शोधतो.