हैदराबाद - इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसनने एका खास फलंदाजाचा टीम इंडियात समावेश करावा, असा सल्ला कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. पीटरसनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'त्या' खास फलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पीटरसनने शेअर केलेल्या व्हिडिओत, डायपर घालून एक लहान मुलगा घरात क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. त्या मुलाचे फलंदाजीतील कसब पाहून पीटरसन प्रभावित झाला आणि त्याने खुद्द कोहलीला टॅग केले. त्यासोबत त्याने, 'तु तुमच्या संघात याची निवड करणार का?' असा सवाल विचारला. तेव्हा विराटनेही पीटरसनला प्रत्युतर दिले. तो म्हणाला, 'हा चिमुकला कुठला आहे, त्याचे कसब अविश्वसनीय आहे.'
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या मुलाचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तो घरात क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. या लहान मुलाला पाहून एखादा अनुभवी क्रिकेटपटू खेळत असल्यासारखे दिसत आहे. फक्त कोहलीच नव्हे तर यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हा देखील प्रभावित झाला आहे.