मुंबई- कोरोनामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. खेळाडू यामुळे आपापल्या घरीच आहेत. अनेक खेळाडू या काळात घरातील कामे करताना दिसत आहेत. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याबरोबरच खेळाडू घराची सफाई करताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान, बीसीसीआयने भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अगरवाल याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आचारी बनला आहे.
बीसीसीआयने मयांकचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात मयांक 'बटर मशरूम'ची रेसीपी सांगत आहे. हा व्हिडिओ जवळपास तीन मिनिटांचा असून यात मयांक प्रत्यक्ष बटर मशरूम तयार करुन दाखवताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान याआधी शिखर धवन, जसप्रीत बुमराह आणि चेतेश्वर पुजारा हेही घरात काम करताना पाहायला मिळाले आहेत.
कोरोनामुळे जवळपास सर्वच स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली आहे. याशिवाय जगभरातील बहुताशं देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ४७ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरामध्ये गेल्या १२ तासात तब्बल १३१ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ९६५ वर पोहोचली आहे.
WC २०११ : धोनीचा षटकार अन् भारताने जिंकला विश्वकरंडक, सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू
इंग्लिश क्रिकेटपटूंना मैदानावर स्मार्टवॉच घालण्यास बंदी, 'या' कारणाने घेतला निर्णय