चेन्नई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईवर मिळवलेल्या विजयात हर्षल पटेलने ५ विकेट घेत मोलाची भूमिका निभावली. या सामन्यात बंगळुरूच्या आणखी एका गोलंदाजाची विशेष चर्चा झाली. ती म्हणजे ७ फूट उंचीच्या कायले जेमिसनची.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा मुंबईने २० षटकात ९ बाद १५९ धावा केल्या. यात ख्रिस लीनने ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ३१ तर इशान किशनने २८ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्मा १९ धावांवर धावबाद झाला. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. हर्षल पटेलने ५ विकेट घेतल्या. या शिवाय कायले जेमिसनने देखील शानदार गोलंदाजी केली. त्याच्या एका चेंडूचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १९व्या षटकामध्ये कायले जेमिसन गोलंदाजीसाठी आला. समोर होता कृणाल पांड्या. या षटकातील तिसऱ्या चेंडू जेमिसनने यॉर्कर फेकला. या यॉर्करचा सामना करण्यासाठी कृणाल सरसावला. मात्र यॉर्कर एवढा घातक होता की कृणालच्या हातात असलेल्या बॅटचे दोन तुकडे झाले.