मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. अशात न्यूझीलंडचा फिरकीपटू आणि राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य इश सोढीही सध्या आपल्या घरी एकांतवासात आहे. त्याने कोरोना विषयावरुन एक भन्नाट गाणे काढले आहे. हे गाणे राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने, लोकांनो कॉन्सर्टसाठी कोठेही जाऊ नका. घरीच राहा आणि सुरक्षित राहा, इश सोढी तुमच्यासाठी कॉन्सर्ट घेऊन येत आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, व्हिडिओत इश सोढी मास्क घातलेला दिसून येत आहे. त्याने १ मिनिट २५ सेकंदाचा 'रॅप सॉन्ग' इंग्रजीमध्ये केला आहे. सध्याच्या घडीला सोधीचे हे गाणं चांगलंच व्हायरल झाले आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मालिका रद्द करण्यात आली. यामुळे न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला. तेव्हा न्यूझीलंडच्या सर्व खेळाडू आणि व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना एकांतवासात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.