पॉटशेफस्ट्रूम - १९ वर्षाखालील आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले. १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने हा सामना डकवर्थ लुईस नियमाने २३ चेंडू आणि ३ गडी राखून जिंकला. दरम्यान सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानात धाव घेत आक्रमक हावभाव करत जल्लोष केला. यादरम्यान बांगलादेशच्या एका राखीव खेळाडूने भारतीय खेळाडूकडे पाहत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर भारतीय खेळाडूंनीही बांगलादेशी खेळाडूला प्रत्युत्तर दिले. यामुळे मैदानात काहीकाळ दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. वेळीच पंचांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला.
बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, 'विश्व करंडक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले. पण विजयानंतर आमचे काही गोलंदाज जल्लोषादरम्यान स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकले नाहीत. ते भावूक झाले होते. यामुळे जे काही घडलं ते घडायला नको होतं.'
भारतीय कर्णधार प्रियम गर्गने याविषयी सांगितले की, 'पराभवानंतर आम्ही नॉर्मल होतो. खेळात हार-जीत होत असते. बांगलादेशच्या खेळाडूंनी आक्षेपार्ह इशारे केले. मला वाटत की असं त्यांनी करायला नको होते.'