केपटाउन- न्यूझीलंडचा संघ जगभरात आपल्या खेळभावनेसाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच त्यांना आयसीसीचा 'स्पिरिट ऑफ द क्रिकेट' पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. गेल्या जुलै महिन्यात लॉर्डस् मैदानात झालेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेच्या इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जी खेळभावना न्यूझीलंड संघाने दाखविली त्यामुळेच या संघाला आयसीसीच्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता न्यूझीलंडच्या ज्यूनिअर संघानेही आपल्या खेळ भावनेने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या अंडर-१९ एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धा सुरू आहे. बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात सामना रंगला होता. विंडीजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा वेस्ट इंडीजचा किर्क मॅकेन्झी याने सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली.
४३ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर धाव काढताना मॅकेन्झीचा पाय मुरगळला आणि तो रिटायर हर्ट झाला. त्यावेळी तो १०३ चेंडूत ९९ धावा करून नाबाद होता. विंडीजचे ९ खेळाडू बाद झाल्यानंतर तो ४८ व्या षटकात पुन्हा मैदानात उतरला. परंतु न्यूझीलंडचा गोलंदाज क्रिस्टियन क्लार्कने त्याला क्लिन बोल्ड केले.