मुंबई -''मी जेव्हा रोहित शर्माला प्रथम फलंदाजी करताना पाहिले, तेव्हा तो खूपच आकर्षक होता आणि त्याने अत्यंत आक्रमक फलंदाजी केली'', असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने म्हटले आहे. रोहितच्या बॅटच्या आवाजाने फार प्रभावित झालो असल्याचेही लीने सांगितले.
बीसीसीआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये लीने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''रोहितच्या बॅटमधून हा आवाज आला होता. बॅटचा तो आवाज..असे वाटले की चेंडू त्या बॅटच्या मधोमध जाऊन धडकला आहे.''
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणनेही रोहितचे कौतुक केले. इरफान म्हणाला, ''जेव्हा रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याची फलंदाजी पाहून मी हैराण झालो.''
इरफान पुढे म्हणाला, "त्याला नेट्समध्ये पाहून आम्ही हैराण झालो. तो प्रत्येक चेंडू सहज खेळत होता. आम्ही नेट्सच्या पाठी विचार करत होतो, की हा आपली कारकीर्द कोणत्या प्रकारे संपवू शकेल?''
इरफानच्या या प्रश्नावर लीने हसून उत्तर दिले, "कदाचित आणखी काही दुहेरी शतकांसह." एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा रोहित एकमेव फलंदाज आहे.