नवी दिल्ली - सुपर स्मॅश लीगमध्ये केंटरबरी संघाकडून खेळत असताना न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने नॉर्दन नाईट्स विरूद्ध एका षटकात सहा षटकार ठोकले. नाईट्सचा फिरकीपटू अँटोन डेवसिचविरुद्ध त्याने सामन्याच्या १६ व्या षटकात हा कारनामा केला. सहावा षटकार ठोकताना त्याच्या मनात काय चालू होते हे, त्याने सामन्यानंतर उघड केले.
हेही वाचा -चहल, पंत आणि सॅमसनने केली आपल्याच फिटनेस ट्रेनरची धुलाई..! पाहा व्हिडिओ
कार्टरने पाचवा षटकार मारला तेव्हा तो चेंडू प्रेक्षकांमधील एका लहान मुलाला लागला. कार्टरला या मुलाची काळजी वाटत होती. 'जेव्हा मी पाचवा षटकार ठोकला तेव्हा तो चेंडू एका लहान मुलाला लागला. मी माझ्या फिजिओला बोलावण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मी सहाव्या षटकाराबद्दल विचार करत नव्हतो', असे कार्टरने म्हटले.
लिओ कार्टर असा विक्रम करणारा जगातील ७ वा खेळाडू ठरला आहे. कार्टर व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, भारताचे रवी शास्त्री आणि युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स, इंग्लंडचा रॉस विटेली आणि अफगाणिस्तानचा हजरतुल्ला जाझाई यांनी एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा कारनामा केला होता. २००७ मधील टी-२० विश्वकंरडक स्पर्धेत भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध ६ षटकार ठोकले होते.