नवी दिल्ली -माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ट्विटरवरून कौतुक केले आहे. धोनी क्रिकेटकडे फक्त एक खेळ म्हणून पाहतो. त्याची क्रिकेटची जीवन-मृत्यूशी तुलना न करण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे, असे लक्ष्मण म्हणाला.
लक्ष्मणने धोनीचा 2007च्या विश्वकरंडक स्पर्धेची ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. लक्ष्मण पुढे म्हणाला, ''एक कर्णधार जो आपल्या कामाद्वारे नेहमीच ओळखला जातो. त्याने 2007ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकून आपल्या कर्णधारपदाची सुरूवात केली. धोनीच्या क्षमतेमुळे तो नेहमी आणि विशेषत: दबावच्या परिस्थितीत धैर्याने काम करतो.''
लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानला हरवून टी-20 वर्ल्ड कपचा पहिला हंगाम आपल्या नावावर केला. तसेच त्याच्या नेतृत्वात, भारताने तब्बल 28 वर्षांनी 2011मध्ये विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
2013मध्ये इंग्लंडमध्ये धोनीने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचेही विजेतेपद मिळवून दिले. धोनीने 2014 मध्ये कसोटी आणि जानेवारी 2017 मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
38 वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही.