हैदराबाद - भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने आपला माजी सहकारी आणि ऐतिहासिक नेटवेस्ट मालिकेचा नायक मोहम्मद कैफचे कौतुक केले आहे. कैफचे क्षेत्ररक्षण इतर खेळाडूंसाठी 'बेंचमार्क' होते, असे लक्ष्मणने म्हटले. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.
लक्ष्मणने ट्विटरवर कैफचा एक फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "भारताच्या तळागाळातील संरचनेचा माणूस. कैफने उत्तर प्रदेशातील संपूर्ण पिढीला असुरक्षिततेची भावना सोडून उच्च पातळीवर खेळण्याची प्रेरणा दिली. त्याचे चपळ क्षेत्ररक्षण इतरांसाठी निकष ठरले. याचे हजारोंनी अनुसरण केले."