नवी दिल्ली -श्रीरामपूरपासून यशापर्यंत पोहोचलेल्या झहीर खानने आपल्या चारित्र्याची ताकद दाखवून दिली आहे, असे मत माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले. लक्ष्मण पुढे म्हणाला, ''झहीरकडे मोठी स्पप्ने पाहण्याची हिंमत होती आणि या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा त्याने निर्धार केला होता. 'लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.
"काउंटी क्रिकेटमध्ये वॉस्टरशायरकडून खेळताना त्याने मिळवलेले यश ही त्याच्या कारकिर्दीची नवी सुरूवात होती'', असेही लक्ष्मण म्हणाला. झहीरने ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2003 वर्ल्ड कपमध्ये तो आशिष नेहरा आणि जवागल श्रीनाथ यांच्यासह भारताच्या गोलंदाजीच्या ताफ्याचा भाग झाला. मात्र त्यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे तो संघातून बाहेर पडला.
2004 मध्ये झहीरने संघात स्थान मिळवले. मात्र, आरपी सिंग, इरफान पठाण, मुनाफ पटेल आणि श्रीशांत संघात दाखल झाले आणि झहीर पुन्हा संघातून बाहेर पडला. त्यानंतर झहीरने काउंटी क्रिकेटमध्ये वॉस्टरशायरकडून खेळण्यास सुरवात केली. काउंटीकडून पदार्पण करत त्याने 10 बळी घेतले. यशस्वी काउंटी क्रिकेटनंतर 2006 मध्ये पुन्हा तो भारतीय संघाचा भाग झाला.
2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने झहीरच्या अनुभवाचा चांगला फायदा उठवला. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत झहीर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीबरोबर संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर होता.
झहीरने भारताकडून 200 एकदिवसीय सामने खेळले असून 282 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 92 कसोटी आणि 17 टी-20 सामने खेळले असून त्यात अनुक्रमे 311 आणि 17 बळी घेतले आहेत. झहीरने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.