मुंबई - भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचे कौतुक केले आहे. लक्ष्मण म्हणाला, ''कुंबळे मोठा खेळाडू आहे. तो जबाबदारीसाठी नेहमी तत्पर असतो. ज्या खेळाडूंसोबत मी खेळलो आहे आणि ज्यांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे अशा खेळाडूंची आठवण मी काढेन.''
2002 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध एंटीगा येथे खेळल्या गेलेल्या सामन्याची लक्ष्मणने आठवण काढली. या सामन्यात कुंबळेने दुखापतीला सामोरे जाताना गोलंदाजी केली होती.
"प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून एक मोठा खेळाडू. जो सर्व अडथळे पार करून पुढे सरसावतो आणि नेहमीच आपली जबाबदारी पार पाडतो. अनिल कुंबळेमधील हेच धैर्य या फोटोतून दिसत आहे. काहीही असो, कधीही हार न मानणे. या वैशिष्ट्यामुळे कुंबळेची एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून छाप सर्वत्र आहे'', असे लक्ष्मणने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
2002 मध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात कुंबळेला मारविन डिल्लनचा चेंडू जबड्याला लागला होता. असे असूनही, त्याने तोंडाला पट्टी बांधत सलग 14 षटके गोलंदाजी केली.
कुंबळे हा कसोटी क्रिकेटमधील भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. त्याने भारताकडून 132 कसोटी सामने खेळले आहेत आणि 619 बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात कुंबळेने भारताकडून 271 सामने खेळले असून 337 बळी घेतले आहेत