मुंबई - इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला शतकाने हुलकानी दिली. शेवटपर्यंत नाबाद राहूनही त्याला कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावण्याची संधी मिळाली नाही. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण याने वॉशिंग्टन सुंदरबद्दल वाईट वाटतं, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.
लक्ष्मण याने वॉशिंग्टन सुंदरबद्दल एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने म्हटलंय की, मला सुंदरविषयी खरेच खूप वाईट वाटतं. मात्र त्याने ज्या पद्धतीने आज फलंदाजी केली आणि संघासाठी जे अमूल्य योगदान दिले, त्याबद्दल त्याला नक्की अभिमान वाटत असेल. मला खात्री आहे की त्याला शतक झळकावण्याची त्याला आणखी संधी नक्की मिळतील.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. यात शुक्रवारचा खेळ संपला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर 60 धावा नाबाद राहिला. आज शनिवारी खेळ सुरू झाल्यानंतर सुंदरने संयमी खेळी करत भारताला तीनशेचा टप्पा गाठून दिला. पण तो 96 धावांपर्यंत मजल मारू शकला.
ऋषभ पंत बाद झाल्यानंतर अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज हे फलंदाजीसाठी आले होते. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सुंदरला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. इशांत शर्मा आणि सिराज हे दोघेही शून्यावर बाद झाल्याने सुंदरचे शतक झळकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.